सोलापूर : मानधन वाढीसह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि इतर मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरू असलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन अद्यापि सुरूच असताना बुधवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात महिला मुक्तिदिनी शेकडो संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुल्यांचे मुखवटे घालून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
गेल्या ४ डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच असल्यामुळे अंगणवाड्या अद्यापि कुलूपबंद आहेत. परंतु या आंदोलनाची कोडी कायम असताना जिल्हा स्तरावर आंदोलक अंगणवाडी कर्मचारी दररोज भजन, थाळीनाद, टाळीनाद, चटणी-भाकर, लाटणे इत्यादी वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन करीत आहेत. बुधवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात महिला मुक्तिदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेसमोर ‘आम्ही सा-या सावित्री ‘ आंदोलन केले, सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाईंचे मुखवटे घालून जागर केला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
या आंदोलनाला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सुरूवातीलाच पाठिंबा जाहीर केला आहे. आज पुन्हा सावित्रीबाई फुले यांच्या नावाने जागर होत असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होऊन महिना उलटला तारी महायुती शासनाला पाझर फुटत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.