Follow us

गोदाघाटाची पुन्हा वाट ! भाजीविक्रेते, टपऱ्या-हॉटेलचालक आणि फेरीवाल्यांनी परिसर पुन्हा काबीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठ वळताच गोदाघाटाची पुन्हा वाट लागली आहे. पोलिस बंदोबस्त, बॅरिकेडिंग हटताच गोदाकाठी आश्रयाला असणारे लहान दुकानदार, घाटाच्या पायऱ्यांवर संसार थाटणारी विस्थापित कुटुंबे, भाजीविक्रेते, टपऱ्या-हॉटेलचालक आणि फेरीवाल्यांनी परिसर पुन्हा काबीज केला आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याअगोदर आणि दौरा निश्चित झाल्यानंतरच्या येथील घटनास्थळाचा आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने घेतला होता. पंतप्रधानांच्या आगमनाच्या धाकाने महापालिकेसह संबंधित सर्वच यंत्रणा झाडून कामाला लागल्या होत्या. अल्पशा निधीवाचून वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या कामांना या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुहूर्त लागला. दौऱ्याअगोदर पोलिसांनी रामकुंड ते गौरी पटांगणापर्यंतचा परिसर बॅरिकेडिंग करून ताब्यात घेतला होता. तत्पूर्वी गोदाकाठच्या भिक्षेकऱ्यांची उचलबांगडी करून परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. रामकुंडात दौऱ्यानिमित्त पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने गोदापात्रातील पाणवेली अन् इतर कचराही वाहून गेला.

मात्र, मोदींची पाठ वळताच पोलिसांनी रामकुंड परिसर सोडल्यानंतर परिसरातील विक्रेते, फेरीवाले, भटके आणि भिक्षेकऱ्यांनी पुन्हा गोदाकाठाकडे धाव घेतली. दौऱ्यानिमित्त कपालेश्वर मंदिर ते सरदार चौक, सरदार चौक ते काळाराम मंदिर आणि तेथून गोरेराम मंदिर परिसरात ललितकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रशासनाने भिंती रंगवून घेतल्या होत्या. त्यासमोर ठिकाणी शनिवारी खिळे ठोकून पाले थाटण्यात आली. पंचवटीची शोभा वाढविणाऱ्या या चित्रांच्या कोपऱ्याचा कोणी आश्रयासाठी, तर कोणी दुकाने थाटण्यासाठी आश्रय घेतला. काळाराम मंदिराच्या परिसरातील पडके वाडे, जुनाट भिंतीचे दर्शन पंतप्रधान व पाहुण्यांना चुकूनही घडू नये, यासाठी या भिंतीवर टाकण्यात आलेले पडदेही दौऱ्यानंतर लगेच हटविण्यात आल्याने तेथील भग्न पथ पुन्हा उघडे झाल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us