Follow us

“नायलॉन मांजा विक्री कराल तर याद राखा”; नाशिक पोलीस आयुक्तांचा कडक इशारा

नाशिक :- नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २६ डिसेंबर २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत. शहरात घातक नायलॉन मांजा बाळगणे, साठा करणे व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशाराही आयुक्त कर्णिक यांनी दिला आहे.

राज्यातील विविध राजकीय पक्षांमधील फूट व त्यामुळे होणारे आरोप-प्रत्यारोप, त्याचप्रमाणे, मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यात विविध आंदोलने चालू आहेत, १ जानेवारी पुणे जिल्ह्यातील कोरेगावभिमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सार्वजनिक ठिकाणी येतात, मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविल्याने अपघात होण्याची शक्यता असते, या कारणातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलीस आयुक्त कर्णिक यांनी १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.

त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल.प्रक्षोभक भाषण, वर्तवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृहांना लागू नाहीत, असेही पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us