Follow us

नाशिकमध्ये वयोवृद्ध महिलेवर ‘तावी’ शस्त्रक्रिया यशस्वी

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील एका वयोवृद्ध महिलेला श्वसनाचा त्रास जाणवत होता. नातेवाईकांनी त्यांना बऱ्याच रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र त्यांना हृदयाचा त्रास त्यात वय अधिक असल्याने त्यांच्यावर उपचार करणे हाय रिस्क असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यानंतर त्यांनी मुंबईत उपचारासाठी धाव घेतली. त्यानंतर त्यांना तावी शस्रक्रिया यावर पर्याय असल्याचे सांगण्यात आले.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये या वयोवृद्ध महिलेवर ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन (तावी) शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. एसएमबीटी हॉस्पिटलच्या हृदयविकार विभागाचे संचालक आणि वरिष्ठ हृदयविकार तज्ञ डॉ. गौरव वर्मा व त्यांच्या टीमने ही शस्रक्रिया पार पाडली.

वय अधिक असल्याने उपचार करणे हाय रिस्क
वयोवृद्ध महिला यमुनाबाई व्यवहारे (रा. नाशिक) यांना शस्त्रक्रियेआधी महिनाभरापासून धाप लागणे, अशक्तपणा, अंधारी येणे,छातीत अस्वस्थ वाटणे आणि झोपेतून सतत जाग येणे अशी लक्षणे जाणवत होती. रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील अनेक हॉस्पिटल व मुंबईतही उपचारासाठी दाखल केले. मात्र वय अधिक असल्याने डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी तयार होत नव्हते. त्यांच्या टू-डी एको कार्डिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये त्यांना तीव्र स्वरूपाचे एओर्टिक स्टेनोसिस (महाधमनी स्टेनोसिस) असल्याचे निदान झाले होते.

हृदय झाले होते कमकुवत
या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत.रक्तप्रवाहामध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे हृदयास प्रचंड त्रास होत होता व यामुळे त्यांचे हृदय कमकुवत झाले होते. या सर्व लक्षणांना हृदयातील डावे नीलय निकामी होणे, असेही म्हटले जात असल्याची माहिती डॉ. वर्मा यांनी दिली आहे.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये केले दाखल
शरीरात अपुरे रक्ताभिसरण होत असल्याने रुग्णाला कमी रक्तदाबाची समस्या निर्माण झाली होती. त्यांच्या किडन्यांवर विपरित परिणाम झाला होता. त्यांची तब्येत वेगाने ढासळत होती. त्यांना पुढील उपचारांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एओर्टिक व्हॉल्व्हमध्ये असलेल्या अडथळ्यामुळे आणि डावे नीलयनिकामी झाल्याने फुफ्फुसामध्ये रक्त साठत असल्यामुळे याठिकाणी सूजही आली होती. शस्त्रक्रियेच्या आधी बरेच दिवस रुग्णालयात यामहिलेला अॅडमिट ठेवण्यात आले होते.

अखेर तावी शस्रक्रिया यशस्वी
त्यानंतर वयोवृद्ध महिलेवर तावी शस्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनी कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आले. दोन्ही शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर त्यांचे हृदय व्यवस्थित काम करू लागले. नवीन व्हॉल्व्हमुळे हृदयाकडून पम्प होणारे रक्त विविध अवयवांपर्यंत पोहोचण्यास कोणताही अडथळा येत नसून महिलेला पूर्वीप्रमाणेच वाटणार असल्याचे डॉ. वर्मा यांनी सांगितले.

तावी शस्रक्रिया म्हणजे काय?
ओपन हार्ट सर्जरीला तावी शस्रक्रिया पर्याय आहे. ही अत्याधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे. रुग्णाच्या मांडीतून एक सुई टाकून कॅथेटरच्या सहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us