Follow us

नाशिक । आयोध्यातील श्री रामलल्ला चरणी नाशिक मधील फुलांचा हार

जुने नाशिक : अयोध्येतील रामलल्लाच्या चरणी नाशिकच्या गुलाबाचा हार अर्पण होणार आहे. फूल विक्रेते भूषण कमोद यांनी सुमारे पाच फुटी गुलाबाचा हार तयार केला आहे. रामलल्लाच्या गळ्यात शहरातून गेलेला हार अर्पण होणार आहे.

माझ्यासह नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून देण्यात आली.

प्रभू श्रीरामाच्या चरण स्पर्श झालेली धार्मिक संस्कृतीचा ठेवा आणि गुलाबांच्या फुलांचे शहर अशी शहराची ओळख आहे. अशा फुलांच्या शहरात उमललेल्या विविध रंगी गुलाबाच्या फुलांचा हार देशच नव्हे तर जगभरातील भारतीय बांधवांच्या श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील रामलाल्याच्या गळ्यात अर्पण होणार आहे.

जुने नाशिक तिवंधा येथील रहिवासी एकनाथ सातपूरकर यांच्या माध्यमातून बुधवारी (ता. ३) सकाळी फुलांच्या हाराचा प्रवास सुरू झाला आहे. गुरुवारी (ता. ४) सकाळी सुमारे दहा ते अकराच्या सुमारास हार अयोध्येत रामलल्लाच्या चरणी दाखल होणार आहे.

सध्या रामलल्लाच्या ज्या मूर्तीचे दर्शन भाविकांकडून घेतले जात आहे. त्या ऐतिहासिक मूर्तीस हार अर्पण होणार आहे, अशी माहिती मंगेश मुसमाडे यांनी दिली. अयोध्येतील राममंदिरासह परिसरात शहरातील गुलाबाचा सुगंध दरवळणार आहे.

फूल विक्रेता हार तयार करत असताना परिसरातील नागरिकांना तयार करण्यात येत असलेला हार अयोध्येत जाणार असल्याचे कळताच नागरिकांनी हारचे छायाचित्र घेण्यास गर्दी केली होती. हार तयार झाल्यानंतर प्रत्येकास आकर्षण ठरत होते.

असा आहे हाराचा प्रवास

अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. सर्वांनाच ते शक्य होत नाही. तर काही असेही नशीबवान आहेत की त्यांना रामलल्लाची सेवा करण्याचे सौभाग्य लाभले आहे. त्यातील एक तिवंधा येथील एकनाथ सातपूरकर आहेत.

मंदिराचे तसेच त्या ठिकाणी सुरू असलेले काम, पूजा विधी यांचे चित्रीकरण करण्याचे काम श्री. सातपूरकर यांना मिळाले आहे. वर्षभरापासून अयोध्येतील राम मंदिरात स्थायिक आहे. कामानिमित्ताने मुंबई येथे आले होते.

बुधवारी पुन्हा अयोध्येच्या प्रवासास निघणार होते. त्यांच्या माध्यमातून आपल्या शेतीत फुललेल्या गुलाबाचा हार रामलल्लाच्या गळ्यात अर्पण व्हावा, अशी इच्छा श्री. सातपूरकर यांचे आप्तसंबंधी मंगेश मुसमाडे आणि त्यांचे सहकाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी निश्चय केला.

त्यातून हाराचा प्रवास सुरू झाला. मंगेश मुसमाडे, शलाका पत्की, प्रसाद पत्की, हिमांशू ठुसे अशा चौघांची गुलाबांची शेती आहे. अत्याधुनिक पॉलिहाऊस गुलाब शेती त्यांच्याकडून केली जाते.

त्यांनी फुललेले गुलाब दहिपूल येथील भूषण कमोद फूल विक्रेत्यास उपलब्ध करून दिले. श्री. कमोद यांनी त्या विविध रंगी गुलाबाच्या फुलांपासून तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाच फुटी हार साकारला.

असा तयार झाला हार

-विविध रंगी पॉलिहाऊसमध्ये फुललेले गुलाबाच्या फुलांचा वापर

-६५० अर्थात ३३ फुलांचे बंडल

-एक किलो अस्टर फुलांचा वापर

-एक मीटर कापडी लेस

-५ फुटी हार

-तयार करण्यासाठी तीन तासाचा कालावधी

“सर्वांचे श्रद्धास्थान रामलल्लास आपल्या शेतीतील फूल अर्पण व्हावेत अशी इच्छा मनात निर्माण झाली. सातपूरकर कामानिमित्त राममंदिरात असल्याने त्यांच्या माध्यमातून आपले फूल अर्पण होऊ शकतात. बुधवारी इच्छा पूर्णत्वास येऊन त्या गुलाबांपासून तयार केलेला हार अयोध्येच्या प्रवासास निघाला. आम्हा सर्वांचे भाग्य आहे. सध्या मंदिरात असलेल्या मूर्तीस हार अर्पण होणार आहे.”– मंगेश मुसमाडे, हार पाठविणारे

“मनाची इच्छा असूनही काही कारणास्तव सध्या तरी रामलल्लाचे दर्शन घेणे शक्य नाही. हार तयार करणे आमच्यासाठी भाग्याचे आहे. हार तयार करताना मोठे आत्मिक समाधान मिळत होते.”– भूषण कमोद, हार तयार करणारा कारागीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us