Follow us

शहरात किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर भडकले…

मोखाडा:- केंद्र सरकारने वाहन अपघातांबाबत हिट ॲण्ड रनप्रकरणी कायद्यात सुधारणा विधेयक आणले आहे. त्याचा विरोध करत देशातील विविध वाहनचालक संघटनांनी आंदोलन सुरू केले. राज्यात ठिकठिकाणी विरोध दर्शवण्यासाठी संघटनांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील माल वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याचा परिणाम रुग्णवाहिका, स्कूल बस, सार्वजनिक वाहतूक, दूध, अन्नधान्य आणि भाजीपाला वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे फळभाज्या, खाद्यपदार्थांचे दर भडकले असून, त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

पालघर जिल्ह्यात भाजीपाला नाशिकच्या मुख्य मार्केट यार्डातून येतो. चक्का जाम आंदोलनामुळे मार्केटमध्ये फळ आणि भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले आहेत. इंधन मिळत नसल्याने दूध, अन्नधान्याची वाहतूक बंद झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही संपाचा फटका सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणच्या बाजारपेठांत खाद्यपदार्थ, भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्याचा फटका पालघर जिल्ह्यातील व्यवसायावर पडत आहे.

एसटीची चाके स्थिरावण्याची शक्यता
जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यांसाठी जव्हार एसटी आगाराची बस व्यवस्था आहे. येथून दररोज ५२ बसफेऱ्यांतून प्रवासी सेवा केली जाते. आज (ता. २) बससेवा सुरू आहे; मात्र उद्या (ता. ३) बसफेऱ्यांसाठी इंधन साठा शिल्लक नसल्याने बससेवा बंद होऊन एसटीची चाके स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि चाकरमानी प्रवाशांचे हाल होण्याची भीती आहे.

परराज्यांतून मालाची आवक मंदावली
नाशिकच्या मुख्य मार्केट यार्डातून पालघरसाठी लसूण आणि नवीन बटाटा आणण्यात येतो; मात्र उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून आवक कमी झाली आहे. त्यामुळे बटाट्याचे भाव सहा ते दहा रुपयांनी वाढत २७ रुपयांवर गेले. मध्य प्रदेशातून मटार आणि राजस्थानमधून गाजराची आवक होते. मटारचे भाव २५ रुपयांवरून ५०; तर गाजराचे दर २० वरून ४० रुपये झाले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर भडकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us