निफाड :- चालू हंगामात निफाड तालुक्यात थंडीने बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रात आज सोमवार (दि.२५) रोजी पारा ८.७ अंशावर घसरल्याची नोंद झाली असून गोदाकाठ परिसरात थंडीचे प्रमाण अधिक होते..
दुष्काळ, अवकाळी आणि गारपीटीनंतर निफाडच्या द्राक्षशेतीला पुन्हा कडाक्याच्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. पारा घसरत असल्याने परिपक्व होत असलेल्या द्राक्षमण्यांची फुगवण थांबणार आहे. तर पारा घसरु लागल्याने तयार झालेल्या द्राक्षमालास तडे जाण्याचे धोके वाढले आहे.
तसेच कांदा, गहु, हरभरा या पिकासाठी वातावरण पोषक आहे. मात्र द्राक्ष बागायतदार मोठ्या चिंतेत आहेत.कारण थंडीत द्राक्षवेलीचे कार्य सुरु राहण्यासाठी पांढरी मुळी व पेशींची क्रिया अविरत चालू ठेवायला पहाटेच्या वेळी ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देणे आवश्यक असते.
मात्र भारनियमनाबरोबरच पालखेड कालव्याकाठी कमी अधिक प्रमाणात वीजपुरवठा असल्याने आडात आहे. पण पोहऱ्यात आणता येईना अशी अवस्था झाली असल्याने वाढत्या थंडीमुळे गाव, वाडी, वस्तीवर शेकोट्याही पेटल्या आहेत.