विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती पुणे-नाशिक महामार्गावर या दिंडीत कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार वारकर्यांचा करूण अंत झाला तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे काल रविवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली.
बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव), बबन पाटिलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी), भाऊसाहेब नाथा जपे (वय 50, रा. कनकोरी, ता. राहाता), ताराबाई गंगाधर गमे (रा. कोर्हाळे, ता. राहाता) या चार वारकर्यांचा गंभीर मार लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर बिजलाबाई अशोक शिरोळे (वय 60, रा. वाकळी, ता. राहाता), राजेंद्र कारभारी सरोदे (वय 50, रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (वय 50, रा. वेस, ता. कोपरगाव), ओंकार नवनाथ चव्हाण (वय 17, रा. मढी खुर्द, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (वय 60, रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापटे (वय 17, रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळे (वय 35, रा. शिर्डी), मिराबाई मारुती ढमाले (वय 60, रा. वावी, ता. सिन्नर) हे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर या दिंडीत भरधाव वेगाने जाणारा एमएच 12 व्हिटी 1455 कंटेनर घुसल्याने हा भीषण अपघात झाला आणि या अपघातात चार वारकर्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कंटेनरचा चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याचा या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितलं जात आहे.
अपघातानंतर घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली आहे. अपघातात वारकरी मृत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींवर संगमनेरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान रात्री पोलिसांनी कंटेनर चालकास ताब्यात घेतले आहे.