Follow us

अवकाळीमुळे पांढरे सोने जमिनदोस्त;

जळगाव :- यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नगदी पीक असलेल्या कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात कपाशीला भाव नाही. अशातच रविवारी (ता. २६) झालेल्या अवकाळी पावसामुळे होती नव्हती ती कपाशी अक्षरशः जमिनदोस्त झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर जणू अस्मानी संकटच कोसळले आहे.

यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी उभ्या कापसाच्या पिकावर ‘रोटाव्हेटर’ फिरवून रब्बी हंगामातील गहू, हरभरा व मका पीक घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविवारी (ता. २६) वादळी व अवकाळी पावसामुळे शेतात उभे असलेले कापसाचे पांढरे बोंड जमिनीवर पडल्याने रब्बी हंगाम पाण्यात गेला आहे

हवामान खात्याचा अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रात वादळी व अवकाळी पाऊस होण्याचे संकेत देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २६) तालुक्यातील जुन्या पाच मंडळातील पारोळ्यात १९ मिलीमीटरर, तामसवाडी २५, शेवाळे १५, बहादरपूर ११ तर चोरवड मंडळात ३६ मिलीमीटरर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.  मोहाडी- दहिगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आडवे झाले आहेत. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा बराच वेळ खंडीत होता. सद्यःस्थितीत तालुक्यात कापूस वेचणीसह रब्बी हंगामाच्या मशागतीला सुरुवात झालेली असताना हे संकट कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. अवकाळी पावसामुळे जो काही कापूस ओला झाला आहे, तो सुकवण्यासाठी शेतकरी उन्हाची प्रतीक्षा करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us